मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक
गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार
-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषीमूल्य साखळी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या माध्यमातून पणन विषयक गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगार वाढीस गती देणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मॅग्नेट प्रकल्पाच्या राज्यातील प्रगतीबाबत आश्वस्त करताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात पणनविषयक गुंतवणूक व रोजगार निर्मितीस चालना मिळाली असल्याचे नमूद केले. मॅग्नेट 2.0 बाबत चर्चा करताना राज्यातील कृषीमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकामी शेतकरी उत्पादक संस्थांसाठी उत्तम कृषी तंत्रज्ञान, कृषीमालाची हाताळणी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, ब्रँण्डींग, जागतिक स्तरावरील कृषी मूल्य साखळ्यांचा अभ्यास, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संस्थात्मक बळकटीकरण, पोषकतत्व आधारीत बाजारपेठ, कार्बन क्रेडीट, हवामान अनुकूल धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ग्रामीण स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी, तसेच शहर स्तरावरील मोठ्या बाजारसमित्यांमध्ये डिजिटायझेशन, घनकचरा व्यवस्थापनाचा अवलंब याबाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत आशियाई विकास बँकेचे अधिक सहकार्य मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत विकसित महाराष्ट्र व्हिजन 2047 च्या अनुषंगाने पणन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment