सन 1937 मध्ये निर्मित ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी वाहना’चे
मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन
‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची सन १९३७ मध्ये इंग्लंडमधील लेलँड (Leyland) कंपनीत निर्मिती करण्यात आली. तर, दि. २४ सप्टेंबर १९४१ रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालिन उंच इमारती, गोदामे तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णत: लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ती हाताने, साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची.
दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात (मुंबई डॉक) उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजाला आग लागली होती. दारुगोळा, स्फोटके, इंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले होते. त्यामुळे, जहाजावरील आगीने रौद्ररूप धारण केले. अशा भीषण परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेतले. बंदरावरील उंच गोदामांतील आग विझवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणे, जहाजाच्या आसपास अडकलेल्यांना वाचवणे तसेच जखमींना खाली उतरवणे आदी शर्थीची कामे या वाहनाच्या मदतीने अविरत सुरू होती. या दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले. मात्र, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राणही वाचले.
No comments:
Post a Comment