Monday, 15 December 2025

#फुगेनाही #noballoons मूर्खपणाचा फुगेबहार.... ©®

 #फुगेनाही  #noballoons 

मूर्खपणाचा फुगेबहार....

©®अमृता खंडेराव.

वाढदिवस किंवा कुठलाही विशेष कार्यक्रम करताना आजकाल फुग्यांची सजावट करण्याची जोरदार पद्धत आली आहे. मागच्या महिन्यात मी एका लहान मुलाच्या वाढदिवसाला गेले होते. तिथे शेकडो फुग्यांची सजावट केली होती. दुसऱ्या दिवशी त्या फुग्यांचे गुच्छ त्यांनी घराबाहेर फेकून दिले. लग्नकार्यात तर संपूर्ण परिसर आणि स्टेज हजारो फुगे लावून सजवले जाते. 


फुग्यांचे मुख्यत्वे चार प्रकार पडतात. 

१. लँटेक्स बलून 

२. फाँईल मायलर बलून

३. हॉट एअर बलून 

४. स्पेशालिटी बलून 


लँटेक्स बलून नैसर्गिक रबरामध्ये रंग आणि काही पदार्थ घालून तयार केले जातात. त्यातील कंपोझिशनुसार त्याचे डीग्रेडेशन होण्यासाठी काही महिन्यांपासून चार वर्षांपर्यंत वेळ लागू शकतो. त्याचे तुकडे पडून ते निसर्गात तसेच साठून राहू शकतात.


फाँईल बलून नायलॉन वर मेटॅलिक कोटिंग करून तयार केले जातात आणि हे अजिबात बायोडिग्रेडेबल नसतात. यांचे 100 वर्षांपर्यंतसुद्धा विघटन होत नाही. म्हणजे तुमच्या एक दिवसाच्या हौसेसाठी तुम्ही पृथ्वीचे शंभर वर्षाचे काम वाढवून ठेवणार...


हॉट एअर बलून लाईटवेट नायलॉनपासून तयार होतात. तंबू किंवा मोठी पाकिटे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनपासून हे फुगे तयार होतात तर स्पेशल बलून फुगे पॉलीक्लोरोप्रेनपासून तयार केले जातात. 


विशेषतः जेव्हा ते सोडले जातात तेव्हा फुगे पर्यावरणासाठी हानिकारक असतात. फुग्यांपासून

धोकादायक कचरा बनतो. ज्यामुळे वन्यजीव (पक्षी, कासव, सागरी सस्तन प्राणी यांच्या अन्नातून फुगे पोटात गेले तर त्यांच्यासाठी फार धोकादायक असते. प्राण्यांनी गिळलेल्या फुग्यामुळे त्यांच्यामध्ये जीवघेणे अंतर्गत अडथळे निर्माण होतात‌. 


फुगे स्वस्त आहेत म्हणून सजावटीसाठी वापरले जातात परंतु ते पर्यावरणासाठी किती मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे याचा विचार केला जात नाही. फुग्यांऐवजी पाने-फुले वापरली तर ती सजावट निसर्गात पुन्हा कुजून जाईल आणि तिचा पर्यावरणाला धोका होणार नाही. 


कुणीतरी एक मूर्ख चुकीची पद्धत सुरू करतो आणि सगळे मूर्ख रांगेने ती अमलात आणायला सुरू करतात. इथे सुशिक्षित आणि अशिक्षित सगळे सारखेच मूर्खपणाच्या आहारी जातात. बऱ्यावाईटाचा कोणीच विचार करत नाही.


भारतीय सुशोभन पद्धतीत फुगे वापरण्याची प्रथा नव्हती आणि नाही. भारतीय सुशोभन पर्यावरणपूरक आहे. पाने, फुले, डहाळ्या, धान्य, रांगोळ्या वापरून आपण सजावट करत आलो आहोत. आंब्याच्या पानांची तोरणे, केळीचे खांब आणि सोपटे, गवत, आंब्याच्या डहाळ्या, कागदी पताका लावून सजावट करण्याची भारतीय पद्धत सर्वात उत्तम आहे कारण या पद्धतीत वापरले जाणारे साहित्य विघटनशील आहे. ते पर्यावरणाला कसलाही धोका पोहोचवत नाही.


आपण सजावटीसाठी जी वस्तू वापरतो तिचे विघटन होत आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. फेकून दिलेले फुगे नंतर मातीमध्ये, जलस्त्रोतांमध्ये अडकून पडतात.  फॉइल फुगे तुटत नाहीत, तर लँटेक्स फुगे प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये विघटित होतात जे मायक्रोप्लास्टिक्स बनतात, माती आणि पाणी प्रदूषित करतात.


कुणाचीही नक्कल करण्यापूर्वी पर्यावरणाचा आधी विचार केला पाहिजे. उगीचच कुणीतरी सरी घातली म्हणून आपण दोरी घालण्यात अर्थ नाही. नवीन पिढीसाठी आपण आधीच प्रचंड प्रदूषित जमीन पाणी हवा निर्माण करून ठेवली आहे. त्यात वेगवेगळ्या चुकीच्या पद्धती वापरून आणखी भर घालून ठेवू नये. 


प्रदूषणाचा महाराक्षस सर्व बाजूंनी पृथ्वीला वेढत आहे त्यात आता ही फुगेबहार आली आहे. आपल्या क्षणिक हौसेसाठी आपण एवढे मोठे प्रदूषण निर्माण करून ठेवत आहोत याचे सुशिक्षित लोकांना तरी भान आहे का? 

©®अमृता खंडेराव.


(ही पोस्ट सर्वांनी शेअर केली पाहिजे.)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi