स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वन आहार महोत्सव शेकडो खवय्यांच्या पसंतीस उतरला
नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा खोऱ्याच्या दुर्गम भागात अतिशय समृध्द, निसर्गाशी नाळ जोडलेली पावरा संस्कृती नांदत आहे. या समाजाच्या संस्कृतीत विविधता आणि समृध्दता आहे. या समाजाच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी पोष फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर सांस्कृतिक मंच, पंचमहाभूते फाऊंडेशन संस्थांच्या समन्वयातून वन आहार महोत्सव आयोजित करण्यात आला. सावरकर स्मारकाच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार, भारतीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
२२ आणि २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ ते रात्री १० या वेळेत हा वन आहार महोत्सव आयोजित करण्यात येत होता. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास पोष फाऊंडेशनचे संस्थापक अमोघ सहजे, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष व 'हिंदुस्थान पोस्ट'चे संपादक रणजित सावरकर, सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, स्मारकाचे विश्वस्त व निवृत्त पोलिस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, दादर सांस्कृतिक मंचाच्या उत्तरा मोने, पंचमहाभूते फाऊंडेशनचे अमित सावंत, प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, प्रसिद्ध सोशल मिडिया इंफ्लुएन्सर निधी देशपांडे, शिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील पावरा या आदिवासी समाजाची संस्कृती, कला, भाषा, खाद्यसंस्कृती यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातून या संस्कृतीची ओळख शहरांतील लोकांना करुन देणे हा महोत्सवाच्या आयोजना मागचा मुख्य उद्देश होता. या वनआहार महोत्सवाला मुंबई आणि मुंबई बाहेरुन आलेल्या खवय्यांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी डुडान रुटु बाजी म्हणजे मक्याच्या भाकरीसोबत रानभाजी, हिता-आथाणो म्हणजेच गव्हाचा डोसा आणि चटणी, डुडान गाठ दाल म्हणजेच मक्याच्या भातासोबत डाळ, वाफला आबण्या कांद म्हणजे वाफवलेले वनकंद, मधुका म्हणजे वन फुलांचा जॅम आणि त्यांचा चहा म्हणजे डोमखा, असे हटके पदार्थ मुंबईकरांना चाखता आले. सारस्वत को. ऑप. बँक या वन महोत्सवाची प्रायोजक होती.
No comments:
Post a Comment