सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 8 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल मनोहर ठोंगे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहीद झालेल्या सैनिकाच्या जीवनाचे मोल करता येणे शक्य नाही. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शासनाच्यावतीने 25 लाख रुपये देण्यात येत होते. यामध्ये ४ पटीने वाढ करण्यात येऊन एक कोटी रुपये करण्यात आले आहे. शासनाकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येते. सेनेप्रती भाव असलेले अनेक नागरिक आपल्या रोजच्या मिळकतीमधून ध्वजदिन निधीसाठी पैसे देत असतात. हा निधी सत्कारणी लागतो, या निधीमधून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
No comments:
Post a Comment