दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई, दि. ०८ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मुंबई उपनगरच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडांगणावर दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवत जिद्द, क्षमता व क्रीडाप्रतिभा प्रभावीपणे सादर केली.
या स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मनोगतात त्यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजातील सर्व क्षेत्रात समान संधी व पुरस्करण मिळणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या स्पर्धेत ४००, २००, १०० व ५० मीटर धावणे, शॉटपुट, सॉफ्टबॉल थ्रो, रनिंग लाँग जंप व स्टँडिंग लाँग जंप अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सहभागी खेळाडूंनी अत्यंत कौशल्यपूर्ण प्रदर्शन करीत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. यावेळी विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच सर्व स्पर्धकांना ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धांचे आयोजन गोरेगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने तसेच एडब्लूएमएचचे प्रेसिडेंट कमांडर श्रीरंग बिजुर व सुमिटोमो केमिकल इंडिया प्रा. लि. चे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट कुणाल मित्तल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध संस्था, शाळा, शिक्षक तसेच पालक यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment