डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार
- राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.१९ : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी सांगितले.
राजदूत विशाल शर्मा यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
राजदूत विशाल शर्मा म्हणाले, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकारातून साकार झालेल्या या निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित झाला आहे. शिक्षणालाच प्रगतीचे मुख्य साधन मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे जीवन आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी बालपणापासून आदर्श आहेत. शिक्षणाच्या जोरावर यश मिळवण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला असून, जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले.
No comments:
Post a Comment