विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार
· विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार
· प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापणार, नोकरीतही प्राधान्य देणार
· प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार
मुंबई, दि. 23 : पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या बाधित सात गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवाद साधला. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह पुरंदर विमानतळाच्या परिसरातील बाधित सात गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment