आदिवासी तरुणांच्या ‘प्लग अँड प्ले’ प्रशिक्षण योजनेसाठी शासन सकारात्मक
- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर, दि. 12 : नाशिकमधील आदिवासी क्लस्टरच्या धर्तीवर राज्यात आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना प्रशिक्षण देणारी प्लग अँड प्ले ही योजना हाती घेण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल. यासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) मार्फत उभारली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
पोभुर्णा आणि करंजी (ता. गोंड पिंपरी, जि. चंद्रपूर) येथे एमआयडीसी क्षेत्रात आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकास करण्यासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न मांडला होता.
उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, संबंधित एमआयडीसी प्रकल्पातील 190 हेक्टर जमीन अधिग्रहणाचा निर्णय विरोधामुळे बदलून सध्या 22.35 हेक्टर जमीन ताब्यात असून ती क्षमता 73 हेक्टरपर्यंत वाढणार आहे.
आदिवासी तरुणांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण सुविधा उभारण्याची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य शासनामार्फत नाशिकमध्ये उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या ट्रायबल क्लस्टरमध्ये एमआयडीसी व आदिवासी समाजाचा एकत्रित ‘मॅचिंग ब्रँड’ तयार करून प्लग अँड प्ले मॉडेल यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी एक अभिनव व स्वतंत्र उपक्रम सुरू केला जाणार असून, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment