वडाळा विभागातील अतिक्रमणावर कडक कारवाई;
बांगलादेशी घुसखोरांविरोधात संयुक्त ऑपरेशन
- राज्यमंत्री योगेश कदम
नागपूर, दि. १४ : वडाळा विभागातील अतिक्रमण, त्यामागील साखळी तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या वास्तव्यास आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना आखल्या असून, गुगल मॅपिंग व गृह विभागाच्या संयुक्त कारवाईद्वारे अतिक्रमण रोखले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तर देताना गृह राज्यमंत्री कदम बोलत होते
गृह राज्यमंत्री कदम म्हणाले की, २०१२ मध्ये स्थापन झालेल्या कांदळवन विभागांतर्गत मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा समावेश असून, सध्या या विभागात १८४ जवान कार्यरत आहेत. मात्र, आतापर्यंत अतिक्रमणाच्या मुद्द्यावर गृह विभाग व संबंधित विभागाची संयुक्त कारवाई झालेली नव्हती.
अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणातून उभ्या राहिलेल्या वस्त्यांची विक्री बेकायदेशीररीत्या भारतात आलेल्या व्यक्तींना करण्यात आल्याचे गंभीर प्रकार लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संपूर्ण कांदळवन विभागाचे गुगल मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील सहा ते आठ महिन्यांत २०१२ पूर्वीपासून सुरू असलेल्या अतिक्रमणांची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.
१५ व १६ डिसेंबर रोजी कांदळवन वडाळा परिसरात गृह विभागाच्या संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. संशयित वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जाईल आणि किंवा बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे व पालघर या संपूर्ण कांदळवन वडाळा कार्यक्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी अशीच कारवाई करण्यात येणार असून, २०१२ नंतर नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा शासनाचा निर्धार त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment