अमरावतीतील राजकमल रेल्वे उड्डाण पुलाच्या
पुनर्बांधणीसाठी निधीची तरतूद करणार
- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
नागपूर, दि. १४ : अमरावती शहरातील वाहतुकीसाठी राजकमल रेल्वे उड्डाण पूल हा महत्वाचा पूल आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या या पुलाचे आयुष्यमान संपल्याने या पुलाची पुनर्बांधणी करणे प्रस्तावित आहे. या उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
सदस्य संजय खोडके यांनी विधान परिषदेत या पुलाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.
मंत्री भोसले म्हणाले, हा लोखंडी पूल आहे. या पुलाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्य दिले आहे.
सदस्य संजय खोडके यांनी या पुलाची तात्पुरती देखभाल दुरुस्ती करून हलक्या वाहनांची या पुलावरून वाहतूक सुरू करणे संदर्भात केलेल्या मागणीचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment