Thursday, 11 December 2025

दिल्लीत सुरू होणाऱ्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात

 दिल्लीत सुरू होणाऱ्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात

·         निवासी आयुक्त आर. विमला यांनी केली पाहणी

 

नवी दिल्ली, 11 राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शुक्रवार 12 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय महाराष्ट्र खाद्य महोत्सव-2025 ची सर्व तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी महोत्सव स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.

 

या पाहणीदरम्यान त्यांनी स्वयंपाकघर, स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगमंच तसेच बालकांसाठी असलेल्या करमणूक विभागाची पाहणी करून सूचना दिल्या. 

 

12 ते 14 डिसेंबर या कालावधीत कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्रातील विविध प्रांतांच्या खाद्यपदार्थांची मेजवानी येथे मिळणार आहे. सावजी मटण रस्सा, मालवणी सीफूड, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ पाव, पुरणपोळी, शेव भाजी, नान कालिया, तर्री पोहे अशा अनेक पारंपरिक पदार्थांचा समावेश असेल.

 

तसेच सातारा, कोल्हापूर, जळगाव, पुणे, अमरावती आणि रायगड जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समूह आपले खास घरगुती पदार्थ घेऊन येत असून, त्यांचे स्टॉल्सही  सजले आहेत.

महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग आणि करमणूक खेळ तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विशेष माहिती स्टॉलही असेल.

 

महाराष्ट्राच्या खमंग आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या खाद्य जत्रेला  भेट द्यावी, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती विमला आणि  निवासी  गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी  केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi