गोवंश संवर्धन आणि भाकड जनावरांच्या पालनाबाबत
शासनाची भूमिका संवेदनशील
- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
नागपूर, दि.१४ : गोवंश संवर्धन आणि भाकड जनावरांच्या पालनाबाबत शासनाची भूमिका अत्यंत संवेदनशील आहे. गोवंश वाचवायचा असेल तर भाकड जनावरांचे संगोपन महत्त्वाचे आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, विक्रम पाचपुते, शेखर निकम, डॉ.संजय कुटे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर उत्तर देताना मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले की, हे प्रश्न नसून सकारात्मक सूचना आहेत आणि त्यावर सरकार आधीपासूनच कार्यवाही करत आहे. भाकड जनावरांच्या पालनासाठी चारा विकास तसेच पावसाच्या अंदाजानुसार चारा व्यवस्थापन आदी उपक्रम हे शासनाच्या नियमित कार्यपद्धतीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. गोवंश केवळ दूधापुरताच उपयुक्त नसून, शेण व गोमूत्राचाही शेतीसाठी मोठा सकारात्मक उपयोग होत असल्याचे मंत्री मुंडे म्हणाल्या.
गोवंश संरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. उलट भविष्यात ही योजना अधिक सक्षम कशी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.
मात्र या कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्यांबाबत शासन अतिशय संवेदनशील असून, अशा घटकांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकरी स्वतः जनावरांची वाहतूक करत असताना त्यांची अडवणूक झाली, तर अशा प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असेही त्यांनी सांगितले.
गोशाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. भविष्यात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे जनावरांची नोंदणी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment