भिवंडी बायपास मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार;
समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी थांबणार
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
नागपूर, दि. १२ : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात येत असून मार्च 2026 पर्यंत हा महत्त्वाचा मार्ग पूर्ण होणार असून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी थांबणार असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले
सदस्य अमोल मिटकरी यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे भिवंडी बायपास परिसरातील रस्त्यांच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देतांना राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी सदस्य निरंजन डावखरे, चित्रा वाघ हे चर्चेत सहभागी झाले होते.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या 2021 मध्ये एनएचएआय कडून हे काम एमएसआरडीसी कडे हस्तांतरित करण्यात आले. रस्त्याच्या कामासाठी मॅंग्रोव्ह, फॉरेस्ट विभाग तसेच रेल्वेच्या आवश्यक परवानग्या मिळवण्यास कालावधी लागल्याने प्रारंभी विलंब झाला. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम 2022 पासून सुरू झाले आहे.
23.8 कि.मी. लांबीच्या या मार्गावर चार पूल असून त्यापैकी तीन पूल जानेवारी 2026 पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. रेल्वेखालील क्रॉसिंगसाठी अंतिम नकाशा मान्यतेसाठी सेंट्रल रेल्वेकडे पाठवला असून मंजुरी मिळताच हा पूलही पूर्ण होईल. रस्त्यावर दररोज 2 ते 2.5 लाख वाहने धावत असल्याने कामाचा वेग कमी झाला असल्याचे सांगत हा रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच बीएमसी–एनएचएआय यांच्यातील करारानुसार अतिरिक्त जागा हस्तांतरित झाल्यावर सुलभ वाहतूक मार्ग निश्चित केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रूट) प्रकल्पालाही वेग आला असून 2028 पर्यंत हा ‘ग्रीन आणि ॲक्सेस कंट्रोल’ मार्ग कार्यान्वित होणार आहे. ऑरेंज गेट–ठाणे असा हा उन्नत मार्ग नागपूर समृद्धी महामार्गासारखा जलद आणि अखंड प्रवासाचा अनुभव देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment