महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट
- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे
मुंबई, ४ : राज्यातील ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी हरित ऊर्जा, डिजिटलायझेशन आणि ग्राहक सशक्तीकरणावर भर दिला जात आहे. भविष्यात महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून, प्रत्येक घर, व्यवसाय आणि शेतकऱ्यापर्यंत हरित ऊर्जेचा लाभ पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
मुंबई येथे झालेल्या "डिस्ट्रीब्यूशन युटिलिटी मीट २०२५" या नवव्या वार्षिक विद्युत वितरण उपयुक्तता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, तसेच इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम, एआयडीए, एमएसइडीसी आणि टाटा पॉवर या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री अतुल सावे म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यात २७,६७४ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती झाली असून, महाराष्ट्र देशातील अग्रगण्य हरित ऊर्जानिर्मिती राज्य ठरले आहे.
सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्याने मोठी झेप घेतली असून सध्या एकूण ११,७०३ मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे. यात ग्रिड-कनेक्टेड सौर प्रकल्प, छतावरील सौर प्रणाली आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना स्वस्त, स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जेचा लाभ मिळत आहे.
No comments:
Post a Comment