Sunday, 16 November 2025

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ति संग्रामात अमुल्य योगदान

 वृत्त क्र.4419

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ति संग्रामात अमुल्य योगदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे व कमल तलावाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगरदि.16 :- मराठवाडा मुक्ति संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. त्यांचे हे योगदान अमुल्य आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   

क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे, तसेच ऑनलाईन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेखासदार संदिपान भुमरेराज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराडआमदार संजय केणेकरआमदार अनुराधा चव्हाणमहापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मराठवाडा मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीस्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण जीवन व्रतस्थ होते. स्वामी विवेकानंदाप्रमाणेच तरूणाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी देशभक्ती जागृत केली. भारत स्वतंत्र झाल्या नंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्याकरीता जवळपास 13 महिन्यांचा कालावधी लागला. या कालावधीत मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता. रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्टा झाली होती, त्याच्याविरुद्ध एक मोठा रणसंग्राम उभा झाला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्यात नेतृत्व करुन हैदराबाद, मराठवाड्यात स्वतंत्र अस्मितेची ज्योत पेटवली. त्यातून अनेक तरुण, महिला या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झाले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या स्वतंत्र संग्राम सेनानींच्या हाकेला प्रतिसाद देत सैनिकी कारवाई केली आणि त्यातून मराठवाडा मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948 हा होता. दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो. या लढ्यात भरीव योगदान दिलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करत आहोतअसे मुख्यमंत्री म्हणाले. स्वामी रामनंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा यावेळी  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी ऐतिहासिक कमल तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील पर्यटन स्थळांमध्ये कमल तलावामुळे भर पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कमल तलावाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वत: तिकीटाची खरेदी करून कमल तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे जाहिर केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi