श्री गुरु तेग बहादुर साहिब जी शहिदी समागमाच्या
नियोजनासाठी गोव्यात २ नोव्हेंबर रोजी समन्वय बैठक
मुंबई दि.३१ : श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गोवा राज्यातील चिकालीम पंचायत कार्यालय सभागृह (वास्को) येथे गोरबंजारा दिवाळी महोत्सव व समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
बैठकीचे अध्यक्षस्थान बंजारा समाजाचे धर्मगुरु व महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्री बाबुसिंग महाराज (राठोड) पोहरादेवी पिठाधीश्वर भूषविणार आहेत. या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि प्रचार आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
शहिदी समागमाचे प्रमुख कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत तसेच राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने नांदेड, नागपूर आणि नवी मुंबई येथे आयोजित होणार असून, नांदेड येथील मुख्य कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला महंत सुनीलजी महाराज, महंत जितेंद्रजी महाराज, सरदार सेवालाल स्वामीजी, महंत गोपालजी महाराज, रमेशजी महाराज आदी धर्मगुरु व संत उपस्थित राहणार आहेत. तर, प्रमुख पाहुण्यांमध्ये गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत, श्री गुरुतेग बहादुर साहिब जी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम २०२५ महाराष्ट्र राज्य समिती राज्य समन्वयक श्री रामेश्वर नाईक, धर्मरक्षक व बारा धाम निर्माते किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद अध्यक्ष विलास राठोड, प्रदेशाध्यक्ष भिकनजी जाधव, गोवा राज्य अध्यक्ष सुरेश राजपूत तसेच उद्योजक आनंद अंगाडी आदी उपस्थित राहणार आहेत.
गुरुबंधुत्व दृढ करणे, समाजांमधील ऐक्य वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शीख, बंजारा, लबाना, मोहयाल, शिकलगार आणि सिंधी समाजातील बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment