बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 3 : राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर, ठाणे व पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन - 2 - बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात 19 स्टेशन्स असणार आहे. हा मेट्रो प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. याकरिता नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी 15 दिवसात सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. जे प्रकल्प मागे पडले ते वेळेत कसे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment