वनमंत्री नाईक म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील. वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने 200 पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी 1 हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आहे. कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे. या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही नाईक यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment