दाही दिशा' पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'दाही दिशा' पुस्तकाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि. ४ : “दाही दिशा' हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे, आणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'दाही दिशा' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, अभिनेत्री निवेदिता सराफ, सकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहूल गडपाले, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगिर, अंकित काणे (संपादक मल्टीमीडिया) आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही भूमिका घेतली आणि राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेले. विकासप्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लावला. कितीही काटकसर असली, तरीसुद्धा जे वचन दिले आहे, जे शब्द आम्ही दिलेले आहेत, ते पाळणार आहे. महिला सक्षमीकरण अभियान, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', लेक लाडकी, लखपती योजना, महिलांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के सवलत योजना, पिंक रिक्षा आणि सारथी, महाज्योती यांच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती योजना अशा लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment