सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा
सविस्तर अहवाल सादर करावा
- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई, दि. 4 : राज्यातील कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.
कातकरी जमातीच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने श्रमजीवी संघटनेने विविध मागण्याबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार स्नेहा पंडित व संबंधित अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, ठाणे पालघर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, या समितीमार्फत कातकरी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार, उद्योग प्रशिक्षण, जमीन हक्क व सामाजिक सक्षमीकरण या सातही घटकांवर विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन पुढील कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे पालघर जिल्ह्यात कातकरी जमातीच्या लहान मुलांची खरेदी विक्री, बाल विवाहाच्या घटना ह्या गंभीर असून यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. या मुलांना बालमजुरी, वेठबिगारी यातून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.
कोलाम, कातकरी व माडिया जमातीसाठी असणाऱ्या केंद्राच्या योजनांच्या अंतर्गत घरकुलाचा लाभ तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. कातकरी जमातीला आधार कार्ड मिळवून देण्यासाठी ठाणे पालघर प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करावे. तसेच कातकरी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचना ही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली
No comments:
Post a Comment