भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन
-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयाचा कौतुकास्पद उपक्रम
मुंबई, दि.29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालयामार्फत दि. 3, ते 5 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी महान कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे.पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर “पर्यटन सर्किट” ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसून, भारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्य, संघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रम, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळे अनुयायी, पर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसून, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment