मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत
हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या निपटाऱ्याकरिता २१ नोव्हेंबर रोजी शिबिरांचे आयोजन
मुंबई,दि.१९ : मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेद्वारे हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्याकरिता २१ नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये दीर्घकाळापासून निष्क्रिय असलेल्या ठेवी, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) इत्यादी मालमत्तेबाबत जनजागृती करणे आणि योग्य हक्कदारांना त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आहे.
या शिबिराद्वारे नागरिकांना विविध बँकांच्या निष्क्रिय खात्यांची माहिती व पडताळणी, दाव्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, संबंधित बँकांचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्याशी थेट संवादाची संधी, ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत या सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांची ठेवी व मालमत्ता तपासावी आणि आपल्या हक्काचा दावा सादर करावा. या शिबिराद्वारे नागरिकांना त्यांच्या आर्थिक हक्कांविषयी जागरुकता निर्माण होऊन निष्क्रिय मालमत्ता योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचविण्यात मदत होईल.
No comments:
Post a Comment