राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· नैसर्गिक शेतीतून शाश्वत कृषी क्रांती होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हवामान बदलाचा शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता, नैसर्गिक शेती ही त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक शेती ही केवळ सेंद्रिय शेतीसारखी नाही, तर ती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक आहे. २०१४ मध्ये झालेल्या नैसर्गिक शेती मिशनचा हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला मात्र त्यावेळी नैसर्गिक व सेंद्रीय शेती हे दोन्ही एकत्रच राबविण्यात आले. नैसर्गिक आणि सेंद्रीय शेती पद्धतीत भेद ठेवला नव्हता. मात्र २०२३ मध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनानंतर महाराष्ट्रात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणींचं मूळ हे वाढत्या उत्पादन खर्चात आहे. उत्पादन खर्च कमी करून आणि उत्पादकता वाढवूनच शेती लाभदायक होऊ शकते. नैसर्गिक शेती ही त्याचा सर्वोत्तम उपाय आहे, कारण निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा उपयोग आपण खते, कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांकरिता करू शकतो.”शेतीच्या सेंद्रिय चक्रात गोधनाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “आपल्या संस्कृतीत गोमातेला उच्च स्थान आहे, कारण ती शेतीला जगवते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही संविधानात गोसंवर्धनाचं तत्त्व अधोरेखित केलं, कारण गोधन हे नैसर्गिक शेतीचं मुख्य आधारस्थान आहे.” गोमूत्र, शेण, जीवामृत यांमधून मिळणाऱ्या पोषक घटकांमुळे शेतीत जैविक संतुलन राखलं जातं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्याच्या रासायनिक शेतीमुळे अन्नातील विषारी घटक वाढल्याचा उल्लेख करत सांगितले की, “आज कॅन्सरसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नैसर्गिक शेतीतून तयार झालेले अन्न हे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असते. राज्यपाल देवव्रत यांच्या प्रेरणेने जसे गुजरात राज्य नैसर्गिक शेतीचे हब बनले, तसेच महाराष्ट्रालाही आपण नैसर्गिक शेतीचं केंद्र बनवू. या चळवळीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू.”
No comments:
Post a Comment