उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोह संपन्न
दर्जेदार साहित्यिक, सांगितीक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे ६ ते ८ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, पत्रकार, कवी, लेखक यांना पुरस्कार प्रदान, सुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अद्ययावत उर्दू घर उभारणार - अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे
या सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, मराठी व उर्दू साहित्यिक देवाण घेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे ‘उर्दू घर योजना’ आहे. ही योजना अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी समाजउन्नतीसाठी कार्य करताना सर्वसमावेशकता, शिक्षण, भाषेचा विकास आणि संस्कृती संवर्धन यासारख्या मूल्यांची परंपरा निर्माण केली. त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळेच उर्दूसह सर्व भाषांना महाराष्ट्रात मानाचे स्थान लाभले.
No comments:
Post a Comment