मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील शैक्षणिक संस्था,
वसतीगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार
- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
· द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनासाठी 500 कोटीची तरतूद
मुंबई, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या मध्ये मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांचे अद्ययावतीकरण, जीर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी पुढील पाच वर्षात, दरवर्षी १०० कोटी याप्रमाणे ५०० कोटी या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार नऊ महाविद्यालये आणि दोन वसतिगृहे यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे सोसायटीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. तसेच या निर्णयामुळे ऐतिहासिक शैक्षणिक संस्थांचे जतन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता वाढणार आहे.
No comments:
Post a Comment