नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त् शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत
• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत
मुंबई दि.१८ :- राज्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत व्हावी म्हणून २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले जात आहे. मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटीवर निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले असून यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सुमारे सात हजार ५०० कोटीची मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपदग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री श्री.जाधव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment