निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट
· 'सिंधुप्रहरी' कार्यप्रणाची घेतली माहिती
· परिवहन विभागानेही केले सादरीकरण
सिंधुदुर्गनगरी, दि 31 : सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. निती आयोगाच्या पथकातील डॉ. देवव्रत त्यागी आणि विदीशा दास यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान पोलीस विभाग आणि रस्ते परिवहन विभाग कशा प्रकारे एआय प्रणालीचा उपयोग करत आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, तहसिलदार दिक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सादरीकरणाव्दारे संपूर्ण माहिती दिली. सागरी सुरक्षेसाठी एआय प्रणालीवर आधारीत 'सिंधुप्रहरी' या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाने एआय प्रणालीवर आधारीत अत्याधुनिक स्मार्ट सुरक्षा प्रणालीचा अवलंब करून सुरक्षाव्यवस्थेत नवे पाऊल टाकले आहे. या प्रणालीद्वारे अपरिचित चेहऱ्यांची लवकर ओळख, त्वरित अलर्ट, सागरी सुरक्षेत वाढ आणि गुन्हे प्रतिबंध शक्य झाले आहेत. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात ठेवल्यामुळे तपास आणि विश्लेषण अधिक अचूक झाले आहे. तसेच स्वयंचलित निरीक्षणामुळे मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर होत आहे. या तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक तत्पर, सजग आणि सक्षम झाली आहे असे त्यांनी शिष्टमंडळाला माहिती देताना सांगितले.
No comments:
Post a Comment