मुंबईत बेकायदेशीर ॲप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई करणार
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २६ : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत २६३ अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल ३.८८ लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, शासनाच्या निर्णयानुसार ॲप-आधारित वाहने चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना तसेच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ८० टक्के भाडे देणे बंधनकारक आहे. प्रवाशांकडून ठरविलेल्या दरापेक्षा कमी जास्त भाडे आकारता येणार नाही.
मुंबईत अनेक ॲप-आधारित वाहने प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर परिवहन विभागाने थेट कारवाई केली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारले पाहिजे. परंतु काही चालक विना परवाना तसेच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे आढळून आले. अशा चालकांवर कारवाईसाठी मैदान पोलिस ठाणे, सांताक्रूझ पोलिस ठाणे आणि अंधेरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.
राज्यात ॲप-आधारित वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने समुच्चयक धोरण (ॲग्रिगेटर्स पॉलिसी) लागू केली आहे. यानुसार परवान्याशिवाय ॲप-आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर व त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे. प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी शासनाने आखलेल्या धोरणांनुसार ॲप-आधारित रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनांवर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment