मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
वाचनाच्या सवयीमुळे मनुष्याची ज्ञान समृध्दी
- सचिव डॉ. किरण कुलकर्णी
मुंबई, दि. 15 : ग्रंथ हे मनुष्याचे मित्र असावेत. प्रत्येकाने सतत वाचत राहिले पाहिजे. ही वाचनाची सवय मनुष्याला ज्ञान समृद्धी मिळवून देत असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्ताने मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय यांच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव श्री. कुलकर्णी बोलत होते. सुरुवातीला माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा वर्मा, गृह विभागाचे प्रधान सचिव राधिका रस्तोगी, साहित्य मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, भाषा संचालक अरुण गीते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी वासंती काळे आणि आभार उपसंचालक राज्य मराठी विकास संस्था अंजली धमाळ यांनी केले.
No comments:
Post a Comment