कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी आमदार मनोज घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, उपसचिव सचिन चिवटे आदी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. भुयारी मार्ग व सेवा रस्त्यांच्या कामांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी कामांना वेग देण्याच्या सूचना कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच ऊस गाळप हंगामात या महामार्गावरच ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील स्लिप रस्ते, कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील वळण मार्गावरील कामे पूर्ण करून तो रस्ता वाहतुकीस योग्य करावा. तसेच भुयारी मार्गाजवळील पर्यायी रस्ते सुस्थितीत करण्यात यावीत. जेणेकरून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही.
No comments:
Post a Comment