अकोल्याचे वैभव सांगळे यांची चित्रकला
जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
नवी दिल्ली,14 : जन्मजात कर्णबधिरतेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने मात करत, चित्रकलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे अकोल्याचे सुपुत्र, चित्रकार वैभव तानाजी सांगळे हे सध्या नवी दिल्लीतील जनपथ, हँडलूम हाट येथे आयोजित 'स्पेशल एक्सपो: सूत्रांचा प्रवास' (द जर्नी ऑफ थ्रेड्स) मध्ये सहभागी झाले आहेत. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या सात दिवसीय प्रदर्शनात वैभव सांगळे यांच्या चित्रांतून साकारलेल्या 'भावस्पर्शी कलाविष्काराने' अनेक कला रसिकांचे लक्ष वेधले आहे.
भारतीय पारंपरिक हातमाग आणि हस्तशिल्प कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या विशेष प्रदर्शनात देशभरातील 75 विणकर, स्वयं सहायता गट आणि सहकारी संस्था भाग घेत आहेत. १६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध राज्यांचे कलाकार आपापल्या क्षेत्रातील पारंपरिक वस्त्र आणि शिल्पकला प्रदर्शित करत आहेत.
या प्रदर्शनात वैभव तानाजी सांगळे यांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या पोट्रेट्स, निसर्ग चित्र, ग्रामीण जीवन आणि वारली पेंटिंग्जमध्ये आढळणारी 'प्रवाही आणि भावनिक अभिव्यक्ती' ही कलाकृतींची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत.
No comments:
Post a Comment