मोटार अपघात दावे निकाली, 40 कोटींची भरपाई
मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२५ : मोटार अपघात दावे न्यायाधिकरण, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला. या लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या ६९९ प्रकरणांपैकी ५४७ दाव्यांचा समेट झाला असून, दावेदारांना एकूण ₹४०,१५,४१,१२८/- इतकी भरपाई मंजूर करण्यात आली. ही लोकअदालत पालक न्यायमूर्ती श्री. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्षा सौ. मोनिका आरलेंड यांच्या देखरेखीखाली पार पडली. अपघातग्रस्तांच्या दाव्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पात्र पॅनल्सची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रक्रियेत अनुभवी न्यायिक अधिकारी, सलोखाकर्ते तसेच संबंधित पक्षांच्या परस्पर संमतीने दावे निकाली काढण्यात आले. यामुळे अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घकाळचा ताण, वेळेचा अपव्यय आणि खटल्याचा खर्च टाळून जलद मदत मिळाली. या यशस्वी लोकअदालतीसाठी कोर्टातील न्यायाधीश, वकील संघटना, विमा कंपनी प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. माननीय पालक न्यायमूर्ती श्री. मोडक आणि अध्यक्षा मोनिका आरलेंड यांनी सर्व संबंधितांचे सहकार्य व वचनबद्धतेबद्दल विशेष कौतुक केले. या लोकअदालतीच्या यशामुळे पुन्हा एकदा पर्यायी वाद निवारण यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, विशेषतः मोटार अपघात दावे यांसारख्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये न्याय मिळविण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरल्याचे नमूद करण्यात आले. असे मुंबई मोटार अपघात दावे न्यायाधिकरण बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. एस.बी.गाडगे व सचिव ॲड.सुशील परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment