महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये
सहकार्याची नवी दारे खुली होणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार
· शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल
· विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले.
सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना
अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या कराराद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैग, विकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment