सुरूवातीला स्वतःचे '४जी' तंत्रज्ञान फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉट, तेजस, आयआयटी, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्ध, देशी तंत्रज्ञानावर आधारित '४जी' तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञान, तेज, कर्मण्यते्द्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाची, वातावरण बदलाची माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योग, शेती, बाजारासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. कनेक्टीव्हीटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही '४जी' कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये '५जी' मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment