परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई
मुंबई, दि. ५ : ठाणे जिल्ह्यातील खारेगांव - ठाणे रस्त्यावर गोवा राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर खारेगांव येथे ३ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या १४०० बॉक्स दारूबंदी कायद्यातंर्गत जप्त करण्यात आले. टाटा कंपनीच्या डीडी ०१ ए ९०१७ क्रमांक असलेल्या चारचाकी टेम्पो वाहनासह एकूण १ कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी मोहम्मद समशाद सलमानी (वाहनचालक) यास अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे, उपअधीक्षक श्री. पोकळे, श्री. वैद्य, नवी मुंबईचे उपअधीक्षक ए. डी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक एम. पी धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, सहा. दुय्यम निरीक्षक बी. जी थोरात, तसेच जवान पी. एस नागरे, पी. ए महाजन, व्ही. के पाटील, श्रीमती एस.एस यादव, एम. जी शेख यांचा सहभाग होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक प्रवीण तांबे, निरीक्षक श्री. धनशेट्टी करीत आहेत, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment