आंतराष्ट्रीय बांबू परिषद : नव्या दिशेची सुरवात
1750 मध्ये इंग्लंडच्या ग्लासगो शहरात पहिले इंजिन फिरले. हवेतला ऑक्सिजन खाऊन कार्बन वाढवत नेला, तापमान वाढवले. गेल्या 250 वर्षात इंजिन वापरून वस्तू तयार केल्या. आता याच विकासातून पृथ्वीवरचा माणूस शिल्लक राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्हाला विकास हवा की प्रदूषणकारी यंत्रापासून निर्मित वस्तू? वस्तू वापरण्यासाठी माणूस देखील आवश्यक आहे. 1750 मध्ये विकासासाठी निर्माण झालेले मॉडेल आता उलटे फिरवावे लागणार आहे. हे असेच सुरू राहिले तर 2050 नंतर मानव जातीची अवस्था नरकात राहिलेले बरे पण पृथ्वीवर नको अशी होणार आहे. सावध ऐका पुढील हाका, अशी आताची परिस्थिती आहे. मानव जात वाचवण्यासाठी जीवाश्म इंधन (Fossile fuel) विरुद्ध जैवइंधन (Bio Fulel) अशी लढाई लढावी लागणार आहे. जैवइंधन निर्मितीसाठी बांबू हे चांगले शस्त्र आपल्या हाती मिळाले आहे. 14 सप्टेंबर 2025 रोजी आसाममधील नुमालीगड या ठिकाणी बांबूवर आधारित इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला अर्पण करणार आहेत. ही घटना देशाला आणि जगाला नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच येत्या 18 आणि 19 सप्टेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत या सर्व गोष्टींची सांगोपांग चर्चा करण्यासाठी जगभरातील तज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांना मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात निमंत्रित करण्यात आले आहे. मानव जातीच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण चर्चा आणि दोन दिवसाच्या परिषदेचे आयोजन हे फिनिक्स फाउंडेशन, लोदगा जि.लातूर आणि आणि राज्य सरकारची महाराष्ट्र सरकारच्या "महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन" (MITRA) संयुक्तपणे केले आहे. काळाची पाऊले ओळखून मानव जातीच्या रक्षणासाठी 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये होणाऱ्या दोन दिवसाच्या चर्चासत्रांमध्ये बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल, थर्मल साठी बांबू पॅलेट्स, लोखंड चारकोल, लाकूड, फर्निचर, बांबू कपडे असे अनेक उद्योग, कौशल्य, पर्यावरण, प्लास्टिक मुक्तीतून शाश्वत म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दिशेने वाटचाल अपेक्षित असणार आहे. शहरी वनीकरण (Urban Forest), ऑक्सीजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून पुढे येणार आहेत.
No comments:
Post a Comment