महाराष्ट्र-श्रीलंका यांच्यामधील व्यापार संबंध अधिक दृढ होतील
- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 17 : श्रीलंकेच्या नव नियुक्त महावाणिज्यदूत प्रियंगा विक्रमसिंघे यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीत परस्पर सहकार्य वृद्धीसाठी सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आणि श्रीलंका यांच्यातील व्यापारसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
श्रीलंका वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र शासन तसेच वाणिज्य मंडळांमध्ये नियमित संवादातून व्यापार वृद्धीचे प्रयत्न; मसाले, वस्त्रोद्योग, पर्यटन, डिजिटल तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये मुंबईत विविध व्यावसायिक परिषदा आयोजित करणे; व्यापार वृद्धीसाठी सुरळीत कस्टम्स प्रक्रिया, बाजारपेठेतील प्रवेश आणि व्यापारी प्रतिनिधीमंडळांना सुविधा; कृषी-आधारित उत्पादने, चहा आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांत विकासाच्या संधी आदी बाबींवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
याचबरोबर फळे, भाज्या, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ व खते श्रीलंकेत निर्यात करणे, वस्त्रोद्योग, हातमाग व फॅशन क्षेत्रात संयुक्त उपक्रम राबविणे, बौद्ध परिक्रमा आणि महाराष्ट्रातील किल्ले व समुद्रकिनारे आदी ठिकाणच्या संयुक्त पर्यटनास प्रोत्साहन देणे, आयटी सेवा, फिनटेक आणि स्टार्टअप भागीदारीस चालना देणे, नवीकरणीय ऊर्जेतील प्रकल्प आणि बंदर संपर्क सुधारणा करून वेगवान व्यापार साध्य करणे आदी क्षेत्रांतील व्यापार वृद्धीच्या संधींवर देखील बैठकीत भर देण्यात आला.
०००००
No comments:
Post a Comment