राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार
'फार्मर कप' उपक्रमाची अंमलबजावणी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- 'फार्मर कप' द्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट
- राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
मुंबई, दि. ४ : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'फार्मर कप' या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे. शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करत आहे. २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात “सत्यमेव जयते फार्मर कप” ची घोषणा करण्यात आली. “सत्यमेव जयते फार्मर कप” या उपक्रमाला व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी राज्य शासन पाणी फाउंडेशनला सहकार्य करेल. “फार्मर कप” या उपक्रमाला राज्य शासनाशी जोडल्याने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील शेतकरी उत्पादक संघटना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलत आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये कृषी विकासाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्याच दृष्टीने राज्यातील हा उपक्रम देखील महत्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले
No comments:
Post a Comment