वृत्त क्र. 3542
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर
बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा
- उपमुख्यमंत्री अजित पवार
बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे
मुंबई, दि. ३ : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
बैठकीला महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री दशपुते, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमार, रेल्वेच्या पुणे विभागाचे अप्पर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला, मुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बैठकीत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment