प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त
७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी
- मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस असून हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे ७५ हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरु राहणार असून १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत आहेत. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही, अशा होतकरू युवकांना आणि युवतींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर उपलब्ध वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.
No comments:
Post a Comment