मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना' चा किनगाव येथे राज्यस्तरीय शुभारंभ
१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका) - प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि.१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबविले जाणार आहे.
किनगाव येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आयोजित या सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉ. कल्याण काळे आणि संदीपान भुमरे, आमदार सर्वश्री संजय केणेकर, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण, आमदार श्रीमती संजना जाधव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment