आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद
मुंबई, दि. ११ :- फिनिक्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या "महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन" (MITRA) यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. वातावरण बदलाचे संकट रोखून मानव जात वाचवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून येत्या १८ आणि १९ सप्टेंबर २०२५ मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दोन दिवसाच्या बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
"बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ" अशी संकल्पना घेऊन या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसाच्या परिषदेतून पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी नवी दिशा मिळेल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी परिषदेबाबत माहिती देताना सांगितले.
पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे. वातावरण बदलामुळे जंगलातील आगी, ढगफुटी, महापूर आणि उष्ण लहरी यासारख्या आपत्ती वाढल्या आहेत. बांबू हा 'कल्पवृक्ष' असून, तो कार्बन शोषण, जंगलतोड रोखणे आणि जैवइंधन निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment