पंडित दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान
एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जयंती समारोह संपन्न
- दीनदयाळ संस्थेच्या प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
यवतमाळ, दि. २९ (जिमाका) : समाजातील गोर-गरीब, वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांचा एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पाहोचविण्यासाठी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
यवतमाळ येथील दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती समारोहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसंराज अहीर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण, डॉ. मनोज पांडे, विजय कद्रे, मनीष गंजीवाले, गजानन परसोडकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यवतमाळ येथील दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान ही जवळपास २५ वर्षांपूर्वी सुरू झालेली संस्था आज एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारली असून, ती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला आणि अतिशय मागासलेल्या आदिवासी पारधी समाजाला मदतीचा हात देत आहे. या संस्थेने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदय या विचारांवर आधारित समाज परिवर्तनाचं एक जिवंत उदाहरण तयार केले आहे, या शब्दात प्रतिष्ठानाच्या कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment