Wednesday, 13 August 2025

*माहेरचा बाळकृष्ण* 🌹

 🌹 *माहेरचा बाळकृष्ण* 🌹


---------------------------------------------------

अशोककाका कुलकर्णी

९०९६३४२४५१

---------------------------------------------------


पूर्वीपासून लग्नामध्ये आई आपल्या मुलीला गणपती , बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या मूर्ती देत असे . त्याचे कारण खूप वेगळे आहे . पूर्वी खूप लहानपणी  लग्न होत होती . बाल वयामध्ये लग्न झाल्यामुळे मुलींचे वय खूपच कमी आसे व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती . घरामध्ये आजी-आजोबा , पणजोबा असे  एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या वीस ते पंचवीस असे . पण मग  हे नवीन लग्न झाले की मुलगी घरात आल्यानंतर ती सर्वात लहान असल्यामुळे तिला सर्वांचा धाक वाटत असे . त्या काळात फोन नव्हते व पत्र लिहिणे सुद्धा अशक्य होते . त्यामुळे आपल्याला नवीन घरातील वातावरण किंवा आपल्याला असलेला धाक  , आपल्याबद्दल सासरी झालेल्या घडामोडी , आई वडिलांना कळवण्याची काहीही सोय नव्हती . त्यामुळे आई मुलीला लग्नामध्ये गणपती देत असे , अन्नपूर्णा व बाळकृष्ण देत असे . तो बाळकृष्ण माहेरचा पाठीराखा म्हणून सासरी येत असे . ही मुलगी सकाळ संध्याकाळ देव घरामध्ये बसून आपल्या मनातले सगळं सुख दुःख  बाळकृष्णाला कथन करत असे . तो एक माहेरचा पाठीराखा आहे असे समजून सर्व मनातील सुखदुःख त्याच्यापुढे उघड केली जात असे व आपले मन हलके केले जात असे . पूर्वी संपर्काची कोणती साधने नव्हती . आजकाल मोबाईल फोन मुळे एकमेकांशी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे . पण तरीही आपल्या देवघरातील बालकृष्ण अन्नपूर्णा आणि गणपती आपला माहेरचा आहे असं समजून प्रत्येक सासूरवाशिन त्या मूर्तींची आत्मीयतेने पूजा करते . कारण तो शेवटी माहेरची पाठीराखा असतो . गणपती याकरता दिला जात असे की नवीन संसाराची सुरुवात होण्यासाठी सुरुवातीपासून गणपतीचे पूजन करावे म्हणून गणपतीची मूर्ती दिली जात असे . पूर्वी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा अन्नाचा सुकाळ व्हावा यासाठी मुलीला दिली जात असे . आपल्या मुलीला अन्नाची ददात कधी पडू नये म्हणून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देऊन त्याचे पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे . आजकाल सर्व बदलले आहे पण तरीही प्रत्येक घराघरांमध्ये अन्नपूर्णा बालकृष्ण आणि गणपती असल्यामुळे त्यांची आत्मीयतेने पूजा केली जाते .

जय श्री राम

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi