नाबार्ड निधीतून सुरू असलेल्या योजनांच्या कामांचा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई, दि.30 : राज्यातील सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत मंजूर कर्ज व प्रस्तावित निधी उपलब्धता आणि या निधीतून करण्यात येत असलेल्या योजनांच्या कामांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सिंचन प्रकल्प, योजनांसाठी नाबार्ड अंतर्गत मंजूर कर्ज व प्रस्तावित निधी उपलब्धतेच्या आढावा बैठकीस सचिव संजय बेलसरे, सह सचिव प्रसाद नार्वेकर, संजीव टाटू, उपसचिव अलका अहिरराव, उपसचिव प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.
कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी खोरे विकास महामंडळ कडील ज्या योजनांची कामे नाबार्ड अंतर्गत मंजूर कर्ज व प्रस्तावित निधी उपलब्धतेत समाविष्ट आहेत या योजनांच्या कामांना गती द्यावी. याबरोबरच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत टप्पा १ व टप्पा २ मध्ये समावेश असलेली कामेही कालमर्यादेत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
कुकडी प्रकल्पांतर्गत करण्यात येत असलेली कामे प्राधान्यक्रम ठरवून करावीत. भीमा नदीवर बांधण्यात येणारे बॅरेज बंधारे, उजनी कालवा दुरुस्तीची कामे हाती घेण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच सोळशी धरण सर्व्हेक्षण आणि सहस्रकुंड धरण कामाबाबतही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी निर्देश दिले.
No comments:
Post a Comment