Tuesday, 5 August 2025

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी

 गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात

रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी

                                                 -मंत्री मंगलप्रभात लोढा

§  जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार

§  जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार

 

         मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात अशा वेळी गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरु ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रांट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.

         गणेशोत्सवा दरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. यावेळी भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरु असल्याची माहितीही मंत्री श्री.लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी स्पष्ट केले.

           गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे दोन हजार नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी म्हाडाझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महापालिका आणि रेल्वे सह बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे न मारता जागच्या जागी त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य झाले असल्याचेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi