भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर
विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा
- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
मुंबई, दि. 12 : रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, दूरदृश्यप्रणालीव्दारे आयुक्त दीपा मुधोळकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह उपस्थित होते.
मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. स्मारक तसेच परिसर विकासासाठी बार्टीच्या सहाय्याने शैक्षणिक उपक्रम देखील या परिसरात सुरू करावे. स्मारकासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असे हे ठिकाण असल्याने त्या दृष्टीने या परिसरात काम करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची स्थापना करून सर्व कामांची माहिती या समितीसमोर सादर करावी, अशा सूचना मंत्री श्री.शिरसाट यांनी यावेळी दिल्या.
स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, स्मारकारसाठी आवश्यक जमीनीचे भूसंपादन करणे, वास्तुविशारद नेमणूक, स्मारकाचे बांधकाम, प्रकल्पाचे टप्पे, मौजे आंबडवे येथील नागरिकांनाच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. सर्व कामांसाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करावेत, असे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.
संध्या गरवारे/विसंअ/
No comments:
Post a Comment