व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- जागतिक व्याघ्र दिनानिमित्त 'वाईल्ड ताडोबा' माहितीपटाच्या ट्रेलरचे
आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या पुरस्काराचे वितरण
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त महाराष्ट्र वन विभाग व एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव शाखेच्या वतीने निर्मित 'वाईल्ड ताडोबा' या माहितीपट ट्रेलरचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्यावतीने वन्यजीव संवर्धन आणि जागरूकता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथु यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.
No comments:
Post a Comment