गणेशोत्सवाचे प्रदेशनिहाय स्वरूप
महाराष्ट्रातील विविध भागांत गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. कोकणात हा उत्सव संस्कृतीला उजाळा देणारा असतो. गावी जाऊन कुटुंबासोबत उत्सव साजरा करणे ही कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. नारळी पोर्णिमा ते विसर्जनापर्यंत निसर्ग, समुद्रकिनारे आणि पारंपरिक घरगुती पूजा यामध्ये एक विलक्षण उत्साह व एकोप्याचे वातावरण अनुभवता येते. या भागातील मूळ कला संस्कृतीची जोपासना व सादरीकरण या काळामध्ये केली जाते. विदर्भ, मराठवाड्यात नाटक, कला, संस्कृती, कवी संमेलन आणि विविध गुण प्रदर्शनाचे आयोजन करणारा महोत्सव म्हणजे गणेश महोत्सव नागपूर, अमरावती, चंद्रपूर यांसारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवाला विसर्जन मिरवणुकीला अनेक वर्षाची परंपरा आहे. विदर्भातील अनेक नामवंत व्याख्यानमाला या काळामध्ये आयोजित केल्या जातात.सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वाधिक रेलचेल या काळात असते.
पुण्यातील अनेक ऐतिहासिक गणपती मंडळांना शंभर वर्षांहून अधिक परंपरा आहे. अनेक मानाची मंडळे आजही परंपरेचे जतन करतात. सांस्कृतिक स्पर्धा, नाटकं, कीर्तनं आणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम हे वैशिष्ट्य येथे जपले जाते.देश विदेशातील कलाकारांना स्थान देणारे अनेक फेस्टिवल, उत्सव,कार्यक्रम या काळात पुण्यामध्ये साजरे होतात.पुण्यातला गणेशोत्सव बघायला देशभरातून नागरिक या काळात पुण्यामध्ये येत असतात.
मुंबई म्हणजे गणेशोत्सवाचा महासागर, गिरगावातून सुरु झालेला हा सार्वजनिक उपक्रम या महानगराची ओळख झाला आहे. चाकरमान्यांची सुट्टी, बाजारपेठेत वाढलेली उलाढाल आणि कला-उद्योगाला मिळणारी चालना यामुळे मुंबईतील गणेशोत्सवाला खास आर्थिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सिने, नाट्य कलावंतांचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये कला जगताने देखील गणेश उत्सवाला चालना दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील या काळात बाप्पा विराजमान असतात. प्रत्येक सोसायटीत होणारा गणेशोत्सव, सार्वजनिक सहभागाचे आदर्श उदाहरण ठरते. शिवाय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि देशभराच्या खाद्य संस्कृतीलाही चालना मिळते
No comments:
Post a Comment